2.3 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

पंचम संगीत रसास्वाद” कार्यशाळेतून उलगडला आर. डी. बर्मन यांचा संगीतमय प्रवास

कुडाळ : आरती प्रभू कला अकादमी आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पंचम संगीत रसास्वाद” कार्यशाळेने ज्येष्ठ संगीतकार आर. डी. बर्मन (पंचमदा) यांच्या चित्रपट संगीताचे सौंदर्य उलगडून दाखवले. या कार्यशाळेत उपस्थित असलेले आर. डी. बर्मन प्रेमी दोन तास त्यांच्या संगीतमय जगात पूर्णपणे रमून गेले. स्वरझंकार, डोंबिवलीचे संदीप जोशी यांनी आपल्या अनोख्या शैलीत पंचमदांचा हा संगीतमय प्रवास रसिकांसमोर सादर केला आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संगीत आणि किस्स्यांची सुरेख गुंफण कुडाळच्या चिं. त्र्यं. खानोलकर ललित कला केंद्रात या “पंचम संगीत रसास्वाद” कार्यशाळेचे, अर्थात संगीत रसिकांसोबतच्या मुक्त संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संदीप जोशी आणि आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य तथा रंगकर्मी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली. आरती प्रभू कला अकादमीचे कार्यवाह केदार सामंत यांनी संदीप जोशी आणि प्रफुल्ल वालावलकर यांचे स्वागत केले. यानंतर संदीप जोशी यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेतला. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, त्या गाण्यांमध्ये विविध वाद्यांचा केलेला वापर, आणि त्यामागील रंजक कहाण्या व किस्से यांची सुंदर पखरण करत, प्रसंगी ती गाणी ऐकवत पंचमदांचा हा प्रवास रसिकांसमोर जिवंत केला. काही गाणी रसिकांना चांगलीच परिचित होती, पण त्यामागे पंचमदांचा नेमका हेतू काय होता, त्यांनी तीच विशिष्ट वाद्ये का वापरली, अशा अनेक गोष्टींचे विवेचन संदीप जोशी यांनी ओघवत्या शैलीत सादर केले. त्यामुळे रसिक आपसूकच आर. डी. बर्मन यांच्या सुवर्णकाळात फिरून आले आणि त्यांच्या संगीताचा अधिक सखोल अनुभव घेतला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य निलेश उर्फ बंड्या जोशी यांनी केले. यावेळी आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष आनंद वैद्य, कमशिप्र मंडळाचे सुरेश चव्हाण, आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य डॉ. जी. एस. कुलकर्णी, बाबा वर्दम थिएटर्सचे विवेक देसाई, सचिन कोंडस्कर, हेमंत देशपांडे, जनार्दन डोर्लेकर, डॉ. संजय सावंत, भूषण जडये, सौ. आर्या जडये आणि इतर अनेक आर. डी. बर्मन प्रेमी संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!