19.5 C
New York
Sunday, August 3, 2025

Buy now

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील पार्किंग केलेली दुचाकी पळवणाऱ्या चोरट्याला केले गजाआड

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी

कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड जेटी येथे ही कारवाई करण्यात आली.

शहरातील बसस्थानकासमोर उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी (एमएच ०७ एन ५८१५) २८ मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती. या प्रकरणी पिसेकामते गावठाणवाडी येथील अशोक अंकुश गुरव यांनी दुचाकी चोरीची तक्रार दिली होती. या चोरीचा कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग समांतर तपास करत होते. गुन्हा अन्वेषण पथकाने दुचाकी चोरीस गेलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात आरोपी अस्पष्ट दिसत होता. त्यानंतर महामार्गावरील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात दुचाकी चोरणारा आरोपी हा नितीन अशोक पाळेकर (वय २८, रा. पाळेकरवाडी, मुटाट) हा असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले. त्याच्यावर यापूर्वी सिंधुदुर्गात गुन्हे असून सीसीटीव्ही मध्ये देखील त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसताना देखील सदर आरोपी हा नितीन पाळेकर असावा अशा अंदाजानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुटाट येथे जाऊन चौकशी केली. यावेळी आरोपी नितीन पाळेकर हा देवगड येथील एका नौकेवर कामाला असल्याचे समजले. त्यानंतर पथकाने थेट देवगड जेटी येथे जाऊन त्या नौका मालकाकडे पाळेकरबाबत चौकशी केली. त्यावेळी पाळेकर हा मासेमारीसाठी समुद्रात गेला आहे. सायंकाळी नौका बंदरात येणार असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार गुन्हा अन्वेषण पथकाने देवगड जेटी येथे सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपी नितीन पाळेकर येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी अंती पाळेकर याने देवगड बसस्थानक परिसरात चोरून नेलेली दुचाकी दाखवली. याखेरीज यापूर्वी तळेबाजार येथूनही एक दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान आरोपी नितीन पाळेकर याच्यावर चोरी प्रकरणी सिंधुदुर्गनगरी, देवगड, विजयदुर्ग आणि मालवण पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने दिली. दुचाकी चोरी प्रकरणी नितीन पाळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक दुचाकी चोरीची प्रकरणे उघडकीस येणार आहेते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!