24.2 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. निलेश राणे

कुडाळ : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत दुसरी महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात प्रलंबित समस्यांवर चर्चा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. विशेषतः, औद्योगिक वसाहतीतील वाढती वीज समस्या आणि भूखंडांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी तातडीने लक्ष देण्याची ग्वाही दिली.
असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी बैठकीत एमआयडीसीची सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या म्हणून वीज पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. नवीन उद्योजकांची वाढती संख्या असूनही अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्यांना उद्योग सुरू करता येत नाहीत. तसेच, सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांनाही आवश्यक वीज न मिळाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून औद्योगिक वसाहतीत नवीन वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन (उपकेंद्र) उभारण्याची गरज असल्याचे होडावडेकर यांनी नमूद केले. आमदार राणे यांनी या विषयात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, जेणेकरून औद्योगिक वसाहतीला विकासाच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण होईल. काही उद्योजकांच्या भूखंडांबाबतच्या प्रलंबित समस्यांवरही यावेळी चर्चा झाली, ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कार्यवाही करण्याबाबत आमदार राणे यांनी ग्वाही दिली.
या बैठकीत कुडाळ औद्योगिक वसाहत असोसिएशनच्या वतीने ‘इंडस्ट्रियल एक्स्पो २०२६’ चे आयोजन करण्याबाबतची संकल्पना असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी मांडली. आमदार निलेश राणे यांनी या संकल्पनेचे स्वागत करत एक्स्पोसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, याबाबतची रूपरेषा ठरवण्यास सांगितले.
आपल्या समारोपाच्या संबोधनात आमदार निलेश राणे यांनी, आपल्या मतदारसंघातील ही जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने तिचा विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या विकासातूनच स्थानिकांना रोजगार मिळेल असे ते म्हणाले. यापुढील काळात असोसिएशनच्या सहकार्याने आपण यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला श्री दत्ता सामंत, श्री संजय आंग्रे, असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, जेष्ठ सल्लागार श्री आनंद बांदिवडेकर, पदाधिकारी श्री राजन नाईक, शशिकांत चव्हाण, संतोष राणे, श्री कुणाल ओरसकर, प्रमोद भोगटे, श्री अमित वळंजू, उदय शिरोडकर, श्री अशफाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांच्या या प्रयत्नांमुळे कुडाळ एमआयडीसीच्या विकासाला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!