दोडामार्ग शिवसेना शिष्टमंडळाची खा. नारायण राणेंकडे मागणी
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी बांदा, दोडामार्ग, आयी राज्यमार्ग दुपदरीकरण करावा, तसेच केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून तालुक्यात सुपारी संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी दोडामार्ग शिवसेना शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार नारायण राणे यांची भेट घेत मागण्या सादर केल्या.
यावेळी गणेशप्रसाद गवस, माजी पंचायत समिती सभापती सौ. धनश्री गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, विवेक एकावडे, विनायक शेटवे यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, काही वर्षांपूर्वी बांदा दोडामार्ग गोवा असा महामार्ग प्रस्तावित होता. मात्र, तो बांदा – पत्रादेवी – पणजी असा करण्यात आला. यामुळे दोडामार्ग तालुक्याची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. यासाठी बांदा दोडामार्ग आयी हा राज्यमार्ग दुपदरी करावा असे म्हटले आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र तालुक्यात सुपारी उत्पादन केंद्र नसल्याने त्या विषयीं असलेल्या योजना तसेच सुपारी नुकसान भरपाई आदी गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना होत नाही. यासाठी केंद्रीय स्तरावरील सुपारी संशोधन केंद्र व्हावे, असे निवेदनात म्हटले आहे.