11.2 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

देवगड तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातून प्रथमच आषाढी पायीवारीचे आयोजन

तारामुंबरी विठ्ठल रुखुमाई मंदिर पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

देवगड : तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यावतीने १९ जून ते ७ जुलै या कालावधीत श्री संत सोपान काका आषाढी पायीवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९ जून रोजी सकाळी ९ वा. श्री क्षेत्र तारामुंबरी येथून ही पायीवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ही पायीवारी सासवड येथे पोहोचल्यानंतर श्री संत सोपान काका आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असून तेथून पारंपारिक मार्गाने पंढरपूरचा प्रवास करणार आहे. पालखी सोहळ्यात श्रीक्षेत्र तारामुंबरीसाठी दिंडी क्र. ८२ असा देण्यात आला आहे, श्रीक्षेत्र तारामुंबरी येथून निघणाऱ्या पायीवारीसाठी भाविकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर- तारामुंबरीचे अध्यक्ष सूर्यकांत जोशी, पायीवारी समितीचे सचिव विश्वनाथ कोयंडे व सदस्य मिलिंद कुबल यांनी केले आहे.

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तारामुंबरी येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोयंडे, कार्यवाह देविदास परब, बांधकाम समिती सदस्य ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते. तारामुंबरी येथून निघणाऱ्या पायीवारीचा प्रवास १९ दिवसांचा राहणार असून श्रींची पालखी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध गावांतून मार्गक्रमण करणार आहे. १९ जून रोजी सकाळी ९ वा. श्री क्षेत्र तारामुंबरी येथून ही पायीवारी निघणार असून दुपारी बाळूमामा मंदिर येथे, रात्री श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड येथे मुक्काम करणार आहे. २० रोजी ही पायीवारी तेथून कोल्हापूर, कराडच्या दिशेने मार्गस्थ होईल. २१ रोजी कराड ते सांगवी, २२ रोजी सांगवी ते सासवड व तेथून पारंपारिक मार्गाने पालखी सोहळ्यातून पायीवारीचा प्रवास राहणार आहे. ही पायीवारी ३ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असून ७ जुलैपर्यंत आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. पायीवारीदरम्यान भोजन व्यवस्था, रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचन, महाप्रसाद आणि समाजोपयोगी उपक्रमांत पायीवारीतील भाविक सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

श्री क्षेत्र तारामुंबरीची पायीवारी यशस्वी पार पाडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी ह. भ. प. नामदेव तळवडकर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत पेडणेकर, सचिव विश्वास कोयंडे, उपसचिव प्रफुल्ल गोलतकर, खजिनदारपदी देविदास परब, कोषागारपदी किशोर जोशी, व्यवस्थापन सदस्यपदी रोहन खवळे, लवलेश धुरत, प्रसिद्धीप्रमुखपदी रामचंद्र कुबल, नीळकंठ राजम, चोपदारपदी मारुती मणचेकर, तर सल्लागारपदी ह. भ. प. किशोर महाराज साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. श्री संत सोपान काकांची पालखी वारी ही केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून श्रद्धा, भक्ती, सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचा संगम मानली जाते. यंदाची वारीदेखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडेल, असा आयोजकांचा विश्वास आहे. हा पालखी सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो. या पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ह. भ. प. नामदेव तळवडकर (९८६७८७९९५९) व देविदास परब (९४२१९०३३६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!