दोडामार्ग : दोडामार्ग तहसीलदार पदी कार्यरत असलेले अमोल पोवार हे गेल्या चार महिन्यापासून गायब असून त्यांना शोधून आणणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची उपरोधिक घोषणा उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे. याबाबतचे एक प्रसिद्ध पत्रक त्यांनी माध्यमांना दिले आहे.
दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात बाबुराव धुरी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरु आहे असे असताना दोडामार्ग तहसिलदार मात्र सुशेगाद सुट्टी उपभोगत आहेत. त्यांनी खुशाल सुट्टी घेऊन फिरावे मात्र दोडामार्ग तहसिलदार पदातून कार्यमुक्त होऊन फिरावे. तालुक्यातील जनतेने महसुली गाऱ्हाणी कुणाकडे मांडावीत. तालुक्यात ५८ गावे असून त्यांच्यावर महसुली अंकुश कोणी ठेवावा. हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा दोडामार्ग मध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते अशा आपत्कालीन परिस्थितीत दोडामार्ग तहसीलदार महोदय हे दोडामार्ग तहसीलदार पदाची पाटी घेवून हिंडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेकडून महसूल विभागाविरोधात रोष निर्माण होत आहे.
तहसीलदार गेले तरी कुठे ?
गेल्या चार महिन्यांपासून दोडामार्ग तहसीलदार पदी कार्यरत असलेले अमोल पोवार हे गायब असून त्यांच्यामुळे दोडामार्ग तहसीलदार पदी प्रभारी तहसीलदार काम पाहत आहेत. ज्यांची शासनाने नेमणूक केली आहे त्यांनी आपल्या पदावर काम करायचे सोडून ते फिरत असल्याचा गंभीर आरोप बाबुराव धुरी यांनी केला आहे. त्यामुळे दोडामार्ग तहसीलदारांना शोधून आणून खुर्चीवर बसवणाऱ्यास आपण ५१ हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीरच केले आहे.