सावंतवाडी : मान्सूनपूर्व पावसानंतर सावंतवाडी शहरात विजेची समस्या होत आहेत. वारंवार विजेचा खंडोबा होतो त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, नागरिकांचे हाल झाले आहेत. मात्र स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा या ठिकाणी लक्ष नाही. त्यामुळे आता तरी मतदारसंघात या अशी हाक ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी दिली आहे. दरम्यान एरवी प्रत्येक मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडणारे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब विजेच्या मुद्द्याबाबत गप्प का? ते आपली भूमिका का स्पष्ट करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत श्री. सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आठवडाभरापासून सावंतवाडी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेक गावांमध्ये आणि शहरात तासनतास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र “मतदारसंघातील जनता वीज समस्येने त्रस्त असताना आमदार दीपक केसरकर कुठे आहेत? त्यांनी आता तरी मतदारसंघात येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात,” अशी हाक सुभेदार यांनी दिली आहे. दरम्यान एरव्ही प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्द्यावर आगपाखड करणारे संजू परब आता वीजेच्या या गंभीर समस्येवर गप्प का आहेत?” असा सवाल करत परब यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. वीज वितरण कंपनीच्या कारभारावरही सुभेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे न केल्यामुळेच वीजेचा “खेळखंडोबा” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा.. ठाकरे सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही सुभेदार यांनी दिला आहे.