मुंबई : पारंपरिक बैलगाडी मार्ग अपुरे पडू लागल्यामुळे शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे १२ फुटांचा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार शेत रस्ता देण्याची तरतूद आहे.परंतु, ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला, त्यावेळी शेती पारंपरिक पद्धतीने बैलजोडी व बैलगाडीच्या साहाय्याने करण्यात येत होती. आता शेती यांत्रिकीकरणाद्वारे केली जात असल्यामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर होऊ लागला आहे. बैलगाडी मार्ग या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहेत. पारंपरिक रस्त्यावरही अतिक्रमण झाल्यामुळे शेत रस्त्यावरून वाद होत आहेत. अशी हजारो प्रकरणे न्यायालयातही प्रलंबित आहेत. आता या निर्णयामुळे असे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. कृषी अवजारे शेतात घेऊन जाता यावीत, यासाठी शेत रस्ता बारा फुटांचा करण्याचा निर्णय घेतला आहे.