वेंगुर्ला : पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं. ४ च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या “कृष्ण-हनुमान युद्ध” आणि “रामदर्शन” या दशावतारी नाट्यप्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पारंपरिक नाट्यकलेत मुलींच्या सहभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्री देवी सातारी मंदिराजवळील धोकमेश्वर येथे सादर झालेल्या “कृष्ण-हनुमान युद्ध” नाटकात कुमारी मृण्मयी परब, चिन्मयी परब, पार्थवी परब, वरदा परब, श्रेया किनळेकर, युक्ता किनळेकर, धनश्री किनळेकर, धनश्री जाधव आणि हंसिका वजराटकर यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यानंतर श्री देव रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे श्रीराम-सीता मंदिराच्या पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त “रामदर्शन” हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगांना शाळेचे शिक्षक संतोष परब यांचे व सिताराम नाईक व पालक शेखर माडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. तसेच, नरेश किनळेकर, सर्व पालकवर्ग आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वेंगुर्ला नं. ४ शाळेच्या या यशस्वी उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.