28.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

KUDAL | पावसाळ्यात दक्ष राहा ; दिरंगाई केली तर कारवाई !

आढावा बैठकीत कुडाळ तहसीलदारांच्या कडक सूचना..

कुडाळ : पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे. कोणतीही दिरंगाई चालणार नाही. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रणेने आपापल्या जबाबदारीने काम करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये, असा सूचना कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक सर्व यंत्रणांना दिल्या. तसेच सर्व विभागांनी चोवीस तास अर्लट राहावे. संबंधितांनी मुख्यालयी राहावे. एखाद्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित विभागांनी तेथे तातडीने पोचून, नागरिकांना मदतकार्य करावे, असे निर्देश देखील तहसीलदार श्री. वसावे यांनी दिले.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे सोमवारी सायंकाळी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारीच्या दृष्टिने फेर आढावा बैठक तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, न.पं.मुख्याधिकारी अरविंद नातू, तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, जि.प.बांधकाम विभाग उपअभियंता राजेंद्र कुलांगे, कनिष्ठ अभियंता सुशांत सावंत, अग्निशमन केंद्राचे अग्निशमन विमोचक प्रमोद परब, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.वर्षा शिरोडकर, एमआयडीसी उपअभियंता अविनाश रेवंडकर, वनक्षेत्रपाल एस.एस.कुंभार, सा.बां. विभाग उपअभियंता धीरजकुमार पिसाळ, पशुधन विकास अधिकारी प्रदिप बांबर्डेकर, जलसंधारण अधिकारी (आंबडपाल) तुषार यादव, बीएसएनएल विभागाचे संतोष राणे, शिक्षण विभागाचे संदेश किंजवडेकर यांच्यासह ग्राम महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, आरोग्य सेवक तसेच सर्व खात्यांचे खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुरूवातीला तहसीलदार वसावे यांनी खातेनिहाय नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी सरपंच तसेच पोलीस पाटील यांनी त्या त्या भागातील पावसाळ्यात उदभवणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात लक्ष वेधले. त्यावर ज्या ज्या ठिकाणी रस्त्यालगत झाडी धोकादायक आहे, ती त्वरीत हटवावी, रस्त्यालगतचे गटारे पाणी वाहण्यास मोकळे करावेत, नाले सफाई तातडीने करून नैसर्गिक पाण्याचे मार्ग मोकळे करावेत, वीज वाहिन्यां सुरक्षित कराव्यात, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बजवावेत, महामार्गालगत सर्व्हिस रस्ते, बाॅक्सवेलमध्ये पावसाचे पाणी साचते, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, धोकादायक वीज पोल व वाहिन्या बदलाव्यात आदी आवश्यक त्या सूचना तहसीलदार श्री.वसावे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभागाने पुरस्थिती तसेच साथरोग काळात सतर्क रहावे. औषधसाठा मुबलक उपलब्ध करून ठेवावा. सर्वत्र यंत्रणांनी पूरग्रस्त गावांत विशेष लक्ष द्यावे. कोणीही दिरंगाई करू नये. आपापली जबाबदारी प्रत्येक यंत्रणांनी चांगल्या प्रकारे पार पाडून आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती कार्यवाही करावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार श्री.वसावे यांनी संबंधित यंत्रणांना दिला. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, आपल्याला कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही श्री.वसावे म्हणाले.
तालुक्यातील आपत्कालीन परिस्थितीवर आपले 24 तास लक्ष असणार आहे. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महावितरण, बीएसएनएल विभाग, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग, आरोग्य विभाग या विभागांनी जास्त लक्ष द्यावे. उर्वरित सर्वच विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना तहसीलदार विरसिंग वसावे यांनी दिल्या. तसेच सर्वच विभागांच्या खातेप्रमुख अधिका-यांनी आपापले मोबाईल क्रमांक तहसीलदार कार्यालय येथील कंट्रोल रूमकडे द्यावेत, हे क्रमांक नागरिकांच्या मदतीसाठी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!