जाणवलीत घरावर फणसाची फांदी कोसळून मोठे नुकसान
कणकवली : तालुक्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. मंगळवारी पहाटेपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नदी – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कणकवली तालुक्यात साधारणपणे २४९८०० रुपयांचे नुकसान झाले होते.
कणकवली तालुक्यातील जाणवली येथील रहिवासी अश्विनी अनिल कदम ( रा. जाणवली ) यांच्या घरावर फणसाच्या झाडाची फांदी कोसळून घराचे तब्बल ६७००० रुपयांचे नुकसान झाले. घरावरील पत्रे देखील मोठ्या प्रमाणात फुटले असून चिऱ्याच्या भिंतींना भगदाड गेले आहेत. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बिडवाडी – साटमवाडी येथील विजय प्रभाकर साळसकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे ८,८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. बिडवाडी, कणखरेवाडी येथील रवींद्र गोविंद राणे यांच्या घराशेजारील ३० फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळून सुमारे ५७५०० रुपयांचे नुकसान झाले. तेथिलच सुदाम तुकाराम चव्हाण यांच्या घरा समोरील संरक्षक भिंत अंशतः कोसळल्याने सुमारे ७७ हजार रुपये इतके नुकसान झाले. तरंदळे, घाडीवाडी येथे प्रविण सदाशिव घाडीगावकर यांच्या घरावर विजेचा खांब पडून ३३००० रुपयांचे नुकसान झाले आहे. गांधीनगर येथील भूषण चंद्रकांत सावंत यांचा मांगर कोसळून ४००० रुपयांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची पंचयादी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खारेपाटण येथील रमाकांत आकाराम राऊत यांची संरक्षण भिंत कोसळून २५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस आणि वादळामुळे कणकवलीत बहुतांश ठिकाणी पडदा होऊन नुकसान झाले असून प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भागांची पहाणी करून पंचनामे करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती.