15.9 C
New York
Sunday, October 12, 2025

Buy now

शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार तळेरे येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि डॉ. ऋचा कुलकर्णी दाम्पत्याला जाहीर

कणकवली : शिक्षण, साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी कार्य करणाऱ्या ‘शारदीय प्रतिष्ठान’ (खारेपाटण सिंधुदुर्ग- वाळपई गोवा) या संस्थेतर्फे स्व. प्राचार्य शरद काळे स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा २ रा ‘शारदीय प्रतिष्ठान’ पुरस्कार तळेरे (जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी या दाम्पत्याला जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठान कडून गेल्यावर्षीपासून एका दाम्पत्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. डॉ. कुलकर्णी दाम्पत्याचे ‘कोकणच्या वैद्यकीय, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. तळेरे सारख्या ग्रामीण भागात प्रसूती व मेडिसीन आंतररुग्ण विभागासह सुसज्ज रुग्णालय गेली ३० वर्षे ते चालवतात. गोरगरीब ग्रामीण जनतेसाठी एक सहृदय ‘कोकणचो डॉक्टर’ म्हणून ते सुपरिचित आहेत. स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध व मनोरुग्णालयांच्या सुधारणा कामात डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे विशेष कार्य आहे.

डॉ. ऋचा यांचे स्त्रीरोगतज्ञ म्हणून आरोग्यविषयक व प्रबोधनपर व्याख्याने, शिबिरे, ‘वयात येताना’ या फिल्मची सहनिर्मिती असे विविधांगी कार्य आहे. दै.’सकाळ’चा आयडॉल आफ महाराष्ट्र २०२२, पुरस्कार, कोलगाव सावंतवाडी येथील ‘आरोग्यलक्ष्मी पुरस्कारा’च्या त्या मानकरी आहेत. पदव्युत्तर शिक्षणानंतर ग्रामीण भागातच स्त्री आरोग्य सेवा करायची ठरवून त्यांनी डॉ. मिलिंद यांच्या कार्याला भक्कम साथ दिली आहे. साहित्यवाचन, चित्रकला व फोटोग्राफी अशी कलासाधनाही त्या करत असतात.

डॉ. मिलिंद यांनी रुग्णांचे विविध अनुभव खुमासदार शैलीत मांडून ‘कोकणचो डॉक्टर’ हे अफाट लोकप्रिय पुस्तक त्यांनी लिहिले आहे. कोकणातील सिंचन सहयोग, कोमसाप, रोटरी क्लब, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, सिंधुरत्न फौंडेशन, निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट, सुनील तळेकर ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय अशा अनेक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे कार्यकारिणी सदस्य आहेत.

गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर स्मृतीप्रित्यर्थ ‘मधुकट्टा’ व ‘संवाद परिवार, तळेरे या संस्था स्थापन करून सातत्याने कार्यक्रम करून परिसरातील लोकांमध्ये साहित्यिक अभिरुची निर्माण करण्याचे मौलिक कार्यही हे दाम्पत्य करत आहेत. सर्जनशील दर्जेदार लेखन प्रांतातही दोघे उत्साहाने कार्यरत असतात.

कोकणचे ज्येष्ठ कथाकार कै. प्राचार्य शरद काळे व त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांचे खारेपाटण शिक्षणसंस्थेचे व्रतस्थ दाम्पत्यकार्य सर्वांना सुपरिचित आहे. याच कार्याचा प्रेरक स्मृतिजागर म्हणून त्यांची मुले कवयित्री डॉ. अनुजा जोशी, सौ.चारूता प्रभुदेसाई, कपिल काळे व काळे कुटुंबियांनी स्थापन केलेल्या या संस्थेतर्फे दरवर्षी एका सेवाभावी, कलाप्रिय दाम्पत्याला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा डॉ. कुलकर्णी दाम्पत्याची यासाठी निवड होऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे. १०,००० रु. मानपत्र व शारदीय स्मृतीभेट असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारप्रदान कार्यक्रम ‘वृंदावन मंगल कार्यालय सभागृह’ * धारखंड, वाळपई गोवा येथे ‘शारदीय स्मृती सोहळ्यात संपन्न होणार आहे. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत व मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (दि. २४ मे २०२५) सायं ४ वा. होणा-या कार्यक्रमात त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ‘ही एक प्रेरक सत्यकथा’ नावाचा स्व. काळेसरांचे जीवनचरित्र, लेखन व कार्यदर्शन घडविणारा विशेष कार्यक्रमही सादर होईल. मालवण येथील प्रसिद्ध लेखिका वैशाली पंडित व काळे कुटुंबीय हा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!