20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

“बांगडा फेक” आंदोलन प्रकरणी नामदार नितेश राणे सह ३२ कार्यकर्ते निर्दोष मुक्त

सिंधुदुर्ग : मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विरोधात, व त्यांच्या समवेत ३२ जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. नामदार नितेश राणे यांचे बांगडा फेक आंदोलन राज्यभर गाजले होते. या प्रकरणातून त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे.

मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात जमावाने घुसत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर एक बांगडा फेकून मारल्याच्या व जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणातून राज्याचे विद्यमान मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह ३२ जणांची जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्यावतीने ऍड संग्राम देसाई, ऍड सुहास साटम, ऍड स्वरूप पई, ऍड यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.

६ जुलै २०१७ रोजी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे आपल्या मालवण येथील मत्स्य आयुक्त कार्यालयात बसले असता सकाळी १० वाजता वाजण्याच्या सुमारास विद्यमान मत्स्य व्यवसाय मंत्री तथा तत्कालीन आमदार नितेश राणे हे आपल्या सोबत सुमारे १०० स्त्री पुरुष कार्यकर्त्यांना घेऊन कार्यालयात कायदा हातात घेऊन घुसले. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांचे कार्यालयातील केबिनमध्ये घुसून त्यांना घेराव घातला.

यावेळी मंत्री राणे यांनी ‘काय करतोस रे तू. स्वतःला शहाणा समजतोस काय ? पर्ससीन धारकांना तू संरक्षण देतोस का ? त्यांच्या कडून पैसे खातोस, त्यांचेवर खटले भरत नाहीस अशा अर्वाच्य भाषेत बोलून हरामाखोर, असे बोलले. तसेच हे त्यांचे बोलणे चालू असताना त्या जमावांमधील कमलाकर उर्फ भाई मांजरेकर यांनी अचानक एक टोपली भर बांगडे मासे सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांच्या टेबलवर ओतले व त्यांना अर्वाच्य भाषेत बोलू लागल्याने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त वस्त हे समर्पक उत्तर देत असताना त्याचा राग मंत्री राणे यांना आल्याने त्यांनी टेबलावर ओतलेल्या बांगड्या पैकी एक बांगडा मासा उचलून तो प्रदीप वस्त यांच्यावर फेकून मारला. तो बांगडा त्यांच्या डाव्या गालावर बसला. तसेच जास्त बोललास तर कानपट्टीत मारीन. यापुढे पर्ससीन नौका धारकांवर कारवाई केली नाहीस, तर त्या नौका पेटवून देऊ व तुम्हालाही पेटवून देऊ अशी जीवेघेणी धमकी दिली.

मंत्री राणे हे प्रश्नांचा भडीमार करीत असताना तेथील साक्षीदार मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत वारूजीकर नियम व कागदपत्रांची नसती दाखवीत असताना मंत्री राणे यांनी ते कागदपत्र ओढून घेत त्यांच्या तोंडावर फेकून मारले व त्यांनाही कानफटीत मारण्याची धमकी दिली. तशी तक्रार मालवण पोलीस ठाण्यात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!