कुडाळ : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. वासुदेवानंद सभागृह कुडाळ येथे झालेल्या या बैठकीत सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी कुडाळ एस.टी. स्थानक व आगारातील दुरवस्था, दररोज उशिरा सुटणाऱ्या गाड्या आणि अचानक गाड्या रद्द होण्याचे वाढलेले प्रमाण याबाबत आमदार राणे यांच्या निदर्शनास आणले. तसेच, कुडाळ स्थानकावरील नवीन बसस्थानक इमारत बांधताना आराखड्यातील तांत्रिक चुकांमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबाबतही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. या तांत्रिक चुका दुरुस्त करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. राणे यांनी दिले. यावेळी संघटनेचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडुलकर, विभागीय सचिव भरत चव्हाण, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, कार्याध्यक्ष सुनील बांदेकर, प्रशांत गावडे, संजय हुमरमळेकर, आगार सचिव मिथुन बांबुळकर, महेश तावडे, निलेश कसालकर, तसेच परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यशाळा यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड उपस्थित होते. संघटना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ आगाराला सीएनजी बसेस दिल्यामुळे वाहतूक कोलमडल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणले. यावर सुजित डोंगरे यांनी ही वस्तुस्थिती मान्य करत, सीएनजी बसेस झाराप पंपावर भरण्यासाठी जात असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत कुडाळ आगारातील जागा सीएनजी पंपासाठी देण्यात येणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत आगारातील पंप सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुडाळ बसस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी. बसेसचे प्रमाण पाहता प्रवाशांसाठी असलेली बैठक व्यवस्था अपुरी असून स्थानकाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने असल्याचे रोशन तेंडोलकर यांनी आमदार राणे यांच्या निदर्शनास आणले. याबाबत एसटी प्रशासनाकडून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले. संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कुडाळ आगाराला नवीन बसेस न मिळाल्याबद्दल सांगितले असता, परिवहन मंत्र्यांशी भेट ठरवून लवकरच कुडाळ आगाराला दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील असे श्री. राणे म्हणाले. जुन्या कुडाळ एसटी बस स्थानकात पोलीस चौकी होती तशाच प्रकारची पोलीस चौकी स्थानकात असावी अशीही मागणी करण्यात आली. आमदार निलेश राणे यांनी यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच, कुडाळ आगाराला आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या काही दिवसांत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी शक्ती संघर्ष कर्मचारी संघ कुडाळ शाखेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.