कणकवली : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार मुसळधार पाऊस कोसळला. अगदी ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या अचानकपणे कोसळलेल्या पावसामुळे वातावरण थंडगार झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ मे पर्यंत ऑरेंज अलर्ट तर २३ मे रोजी येलो जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच विजा चमकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत, दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, विजेच्या खांबांपासून लांब रहावे, विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये, विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात, वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे, पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या, अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका, घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोंताकडून हवामनाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्याव, पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे, अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा, मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.