सिंधुदुर्गनगरी : वयाची ७० पार केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर निदर्शने आंदोलन केले. सेवानिवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने या सेवानिवृत्त शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. २१ जून २०२२ च्या निवडश्रेणी मंजूर आदेशाप्रमाणे ४ शिक्षणाचे सुधारित निवृत्ती वेतन आदेश देण्यात यावेत, ८० शिक्षकांच्या कार्यरत कालावधीची देयके त्वरित देण्यात यावी, ३० जून/१जुलै च्या काल्पनिक वेतनवाढीचे लाभ १०० टक्के पूर्ण करावेत, ११ शिक्षकांच्या वसूल केलेल्या अतिप्रदान रक्कमा त्वरित परत कराव्यात, १ जानेवारी १९६८ पासून सेवेत रुजू झालेल्यांना निवडश्रेणीचा लाभ तत्काळ मंजूर करावा, पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांची सापडलेल्या सेवापुस्तकांसह निवडश्रेणी सेवाज्येष्ठता सूची त्वरित अद्यावत करावे आणि काहींची दुरुस्ती करावी, पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांच्या गहाळ सेवापुस्तकांचा त्वरित शोध घ्यावा, सन २०१८ पूर्वीच्या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा त्वरित लाभ द्यावा, दरमहा १ तारीखला निवृत्तीवेतन द्यावे, पेशन अदालत नियमित घेण्यात यावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, सोनू नाईक, बाबू परब आदी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.