सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून, विरोधाला विरोध जुमानणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे मांडली. ज्या शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची भूमिका असेल, ती निश्चितच समजून घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून, फुकेरी गडाची एक इंच जागाही या प्रकल्पात जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सावंतवाडी शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, पर्यटक शहरात कसे वळतील यासाठी दीपक केसरकर कार्यरत आहेत आणि ते त्यासाठी सक्षम आहेत, असेही संजू परब म्हणाले.
संजू परब यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, गुरुनाथ सावंत, पप्पू सावंत आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. या महामार्गामुळे इथल्या उद्योजकांना आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इथला आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम आदी फळे नागपूरला १० तासांत पोहोचतील, त्यामुळे मोठा रोजगार निर्माण होईल.
माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे.”
“ज्यांचे आयुष्य लाकूडतोड आणि जंगलतोडीत गेले, ते आज शक्तिपीठ महामार्गाला विरोध करताना पर्यावरणाच्या काळजीचा आव आणत आहेत. त्यांच्या विरोधामागे हेतू वेगळा आहे. बांदा येथेही विरोध झाला, मात्र विरोधाला न जुमानता हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण केला जाईल. बांदा सरपंचांची समजूत काढली जाईल. ज्यांची शेती, बागायती, घर यात जाणार आहे, अशा गोरगरिबांच्या मागण्यांवर निश्चित तोडगा काढला जाईल. योग्य मोबदला त्यांना कसा मिळेल, यासाठी दीपक केसरकर आणि निलेश राणे यांचे लक्ष वेधले जाईल.
विरोध करणाऱ्यांच्या मागण्याही समजून घेऊन सोडवल्या जातील. तसेच, शक्तिपीठ महामार्गामुळे फुकेरी गडाच्या एक इंच जागेलाही बाधा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
“मुंबई-गोवा महामार्ग जरी शहराबाहेरून गेला, तरी पर्यटक शहरात येत आहेत. निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक असे हे शहर आहे. त्यामुळे पर्यटक इथे कसे वळतील, यासाठी दीपक केसरकर कार्यरत आहेत. पर्यटन योजना, खाद्यसंस्कृती आदींच्या माध्यमातून शहराकडे पर्यटक वळवण्याचा आमचा मानस आहे. शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महामार्गाचा मोठा फरक शहरावर होणार नाही,” असेही ते म्हणाले.