कणकवली : कणकवली बसस्थानकातील उपहारगृहामध्ये काम करणाऱ्या प्रवीण बाळा म्हाडेश्वर (४९, रा. शिवडाव, ओटसवाडी) यांना शनिवारी सकाळी अचानक श्वास घेताना त्रास होऊ लागला. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रवीण म्हाडेश्वर हे कणकवली बसस्थानकातील उपहारगृहामध्ये काम करून तेथेच रहायचे. त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने उपहारगृहाचे चालक बोंद्रे यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.