अन्यथा आंदोलनाचा सुशांत नाईक यांचा इशारा : पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआमपणे अमली पदार्थांची विक्री होत आहे. त्याच्या आहारी गेल्याने युवा पिढी बरबाद होत चालली आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा बिमोड करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे. मात्र, या विक्रीला आळा घालण्यास पोलिस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा बिमोड करण्याबरोबरच अवैध धंद्यांना पोलिसांनी आळा न घातल्यास शिवसेना स्टाइलने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा उद्धवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुडाळ येथील युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गुरूनाथ पेडणेकर, धीरज मेस्त्री, रोहित राणे, योगेश धुरी, अमित राणे, गुरू गडकर आदी उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. युवा पिढीला अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने त्या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढले आहेत.
पालकमंत्रीपदाची सूत्रे नितेश राणे यांनी हाती घेतल्यानंतर, माझ्या जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होऊ देणार नाही, अवैध धंदे चालू देणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यानंतर एक महिना या अवैध धंद्यांना बेक्र लागला होता. मात्र, पुन्हा ते सुरू झाले आहेत. पालकमंत्र्यांनी हे धंदे पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक तडजोड केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
अवैध धंद्यांना वेळीच आळा घालणे गरजेचे
१) अमली पदार्थांची विक्री व अवैध धंद्यांमुळे संघटित गुन्हेगारी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने अवैध धंद्यांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
२) जिल्ह्याच्या लगत असलेल्या गोवा राज्यातून दारू आणून तिची विक्री सिंधुदुर्गातील विविध भागांत होत आहे. जिल्ह्यात सुरू राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंद्यांना आळा बसावा, अशी मागणी आम्ही पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
३) सध्या चिठ्ठीवर मटका घेण्याचे प्रमाण कमी झाले असून, मोबाइलवर आता मटका घेतला जात आहे. हा मटका बंद व्हावा, असेही नाईक यावेळी म्हणाले.
बंधूंच्या मागणीकडे पालकमंत्री नितेश राणे गांभीर्याने पाहणार आहेत का ? – नाईक
जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांचे बंधू आमदार नीलेश राणे यांनी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे पालकमंत्री हे धंदे बंद करण्यासाठी पावले उचलणार आहेत का? आपल्या बंधूच्या मागणीकडे मंत्री राणे गांभीर्याने पाहणार आहेत का? असा सवाल नाईक यांनी यावेळी केला.