महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे प्रमुख मागणी!
शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चा!
सिंधुदुर्ग : बिहार राज्यातील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हा मोर्चा काढण्यात आला असून गेले अनेक वर्षे सुरू असलेली मागणी पूर्ण होण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या मोर्चात जिल्ह्यातील बुद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. बिहारमध्ये जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगया आहे. बोधगया हे बौद्ध धर्माच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. जिथे भगवान बुद्धांना दुःखमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले. बोधगया येथील महाबोधी महावीहार हे भारताबरोबरच जगभरातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मात्र जगभरातील बौद्धांसाठी वंदनीय असणाऱ्या पवित्र स्थळावर सध्या ब्राह्मणांचा कब्जा आहे. सन १९४९ च्या बोधगया टेम्पल कायद्यातील बोधगया महाविहार व्यवस्थापन समितीच्या रचनेबाबतच्या अन्यायकारक तरतुदीमुळे महाबोधी महाविहार या बौद्धांच्या पवित्र स्थळावर ब्राह्मणांनी कब्जा मिळवला आहे. त्यांच्या कब्जातून हे पवित्र स्थळ मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात मिळावे. यासाठी देशभरात आंदोलन सुरू आहे .या सुरू असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दी बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यातील विविध संघटना एकवटल्या असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध बौद्ध संघटनाचे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामध्ये आनंद कासार्डे कर , विद्याधर कदम, मधुकर तळवणेकर, संदीप कदम, अंकुश कदम, शामसुंदर जाधव, रवींद्र पवार, सुषमा हरकुळकर, शारदा कांबळे, अंजली कदम, श्रद्धा कदम,अंकुश जाधव, यांच्यासह भंते सचित बोधी, भंते प्रज्ञावंत, भंते अश्वजीत, इत्यादी प्रमुख पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडताना जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील बौद्ध बांधव एकत्रितरित्या लढा देतील. असा इशारा दिला तर आपल्या मागण्यांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.