सातारा जिल्ह्यातील नांदगावच्या आजींच्या रिक्षाला प्रवाशांची पसंती ; सर्वत्र होतंय कौतुक
सातारा : आवड असली की सवड निर्माण होते असं म्हणतात याची प्रचिती सातारा जिल्ह्यातील नांदगाव येथील ६५ वर्षीय आजी मंगल आवळे यांना आली आहे. घरात असलेली रिक्षा आपल्या मुलाकडून त्या चालवायला शिकल्या आणि बघता बघता ६५ वर्षीय मंगल आवळे रिक्षा चालवू लागल्या. आज त्यांच्या रिक्षातून जायला प्रवाशांची पसंती मिळत आहे. गर्दी असो वा चढ उतार या आजी न घाबरता सराईतपणे कुठेही रिक्षा घेऊन जातात.
६५ वर्ष वय असतानाही त्यांच्या इच्छाशक्तीची दुर्दम्य झेप तरुणांनाही लाजवणारी आहे. आज त्या उंडाळे भागातील तसेच सवादे जिंती या भागातील दुर्गम भागातही रिक्षा घेऊन जातात. केवळ दोन ते तीन दिवसात आजी रिक्षा शिकल्या आणि गेली १५ दिवस या आजीने आपल्या रिक्षाचा प्रवास सुरू केला आहे. उंडाळे परिसरात आता या आजी रिक्षावाल्या आजी म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. आजच्या मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईपुढे मंगल आवळे या रिक्षावाल्या आजीने चांगलाच आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, या रिक्षा चालवणाऱ्या ६५ वर्षीय आजींची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. तसेच त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारकडून महिलांना १० हजार पिंक इ रिक्षांचे वाटप
राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्टाने सरकारने राज्यात १० हजार महिलांना पिंक इ-रिक्षाचे वाटप केले आहे. शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे, रात्री अप-रात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील, असे उद्दिष्टही या योजनेमागे असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे, पिंक इ-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात पार पडला. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना (Pink E Rikshaw Scheme) सुरु करण्यात आली आहे. महिलांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. आता या योजनेअंत्रगत १० हजार पिंक ई- रिक्षांचे वाटप करण्यात आले आहेत. एकूण ८ जिल्ह्यातील १० हजार महिलांना या रिक्षा वाटप केल्या आहेत. यात नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, कोल्हापरूचा समावेश आहे.