कणकवली : फोंडाघाट – कनेडी मार्गावरील पावणादेवी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधा योजने अंतर्गत सुरू होते. ‘ते काम खराब झाले आहे, ते बंद करा’, असे सांगितल्यानंतर या कामाचे सुपरवायझर आत्माराम मधुकर येरम (५६, रा. फोंडाघाट, पावणादेवीवाडी) यांनी त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून त्याच वाडीतील सुयेश बाबाजी वाळवे (३५), बाबाजी दिनकर वाळवे (६०) आणि दिवाकर विठ्ठल ठाकूर (५६) यांनी आत्माराम येरम यांना शिवीगाळ करत लोखंडी पाइपने, हाताच्या थापटाने मारहाण केली, तसेच त्यांना सोडविण्यास गेलेल्या मुलीलाही मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आत्माराम येरम यांच्या तक्रारीवरून सुयेश वाळवे, बाबाजी वाळवे, दिवाकर ठाकूर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्माराम येरम हे ठेकेदार हेरंब चिके यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम पाहतात. सुरेश वाळवे, बाबाजी वाळवे, दिवाकर ठाकूर यांनी तेथे येऊन रस्त्याचे काम खराब झाले आहे असे सांगून काम बंद करण्यास सांगितले. त्यावेळी ठेकेदाराने मार्चअखेर असल्याने नंतर काम करून देतो, असे सांगितले होते. शनिवारी हे काम सुरू करण्यात आल्यानंतर सुयेश वाळवे, बाबाजी वाळवे, दिवाकर ठाकूर हे तिघे तेथे आले आणि येरम यांना शिवीगाळ करून काम बंद कर, असे सांगितले. येरम यांनी काम बंद कर असे सांगणारे तुम्ही कोण? असे सांगितले. त्याचा राग येऊन बाबाजी वाळवे याने मारहाण केली. सुयेश वाळवे याने तक्रारदार याला मारहाण करून शर्ट फाडला. त्यावेळी तक्रारदारांची मुलगी अस्मिता ही तेथे आली असता तिलाही मारहाण केली, तर दिवाकर ठाकूर याने धमकी दिल्याचे तक्रारीत आत्माराम येरम यांनी म्हटले आहे.