कणकवली : पहेलगाम हत्त्याकांड हे माणुसकी हरवत चाललेल्या आधुनिक जगाचा हिडीस चेहरा आहे. एकेकाळचा साम्राज्यवाद आता क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या धार्मिक दहशतवादात परिवर्तित होत आहे. आपण सर्वसामान्य भारतीय नागरिक “मला काय त्याचे” अशा षंढ विचाराने कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, हे तर फारच गंभीर आहे.
आपल्या चेतना, संवेदना जागृत असतील तर पहेलगाम हत्त्याकांड परिस्थितीचा, प्रवृत्तीचा निषेध, प्रत्यवाय करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची ग्वाही देत मृत व पिडीताना आदरांजली देत; भारतीय नागरिकांना आश्वस्त करूया. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी कणकवली येथील “आम्ही कणकवलीकर’ यांनी आयोजित श्रद्धांजली सभेत केले.
_आज मी, माझा (राजकीय) पक्ष, माझा नेता आणि माझ्या पक्षाची मतप्रणाली यामध्येच भारतीय नागरिक विभागला गेला आहे. *”मी भारताचा आणि भारत माझा” अशी राष्ट्रीय एकात्मतेची भावना* कुठेही दिसून येत नाही._ *समूह नायकही त्या दृष्टीने राजकारण, समाजकारण करताना आढळत नाहीत. देश घडविणारी किंवा बिघडविणारी तरूणाई आभासी जगातच जगत असल्याने,* या तरुण पिढीला पुढील वर्षभरात “मी भारताचा आणि भारत माझा” अशी राष्ट्रीय एकात्मतेची भावना ईथे जमलेल्या प्रत्येक सजग; जाणकार; संवेदनशील नागरिकांनी करून दिली तर, पहेलगाम हत्त्याकांडात नाहक मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयाना खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान आपण बाळगू शकू. असे ते पुढे म्हणाले.
पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काश्मिरी जनता देखील मोठ्या प्रमाणात यावेळी रस्त्यावर उतरली. तसेच अनेक पर्यटकांचे प्राण या हल्यापासून वाचवण्यात आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात कश्मीरी जनतेने पुढाकार घेतला. या सर्व बाबी काश्मीर बाबत आशादायक चित्र निर्माण करणाऱ्या आहेत. यासाठीच आता काश्मीर ते कन्याकुमारी सर्व नागरिकांमध्ये भारतीयत्वाची भावना निर्माण होणे , गरजेचे असल्याचे डीडी न्यूजचे पत्रकार विजय गांवकर म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, सेवानिवृत्त संघटनेचे सीताराम कुडतरकर, कणकवली महाविद्यालयाचे प्रा. हरिभाऊ भिसे यांनी आपले विचार व्यक्त केले. अखेरीस विनायक मेस्त्री यांनी आढावा घेऊन मृतात्म्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या शोकसभेसाठी सौ.सुप्रिया पाटील, पत्रकार रमेश जोगळे, संतोष राऊळ , निवृत्त पोलिस निरीक्षक अर्जुन राणे, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, हनीफ पीरखान, मनोहर पालयेकर, संजय पाध्ये, कृष्णा दळवी, सखाराम सपकाळ , प्रसाद घाणेकर , डॉ. करंबेळकर, श्री.पटेल , ज्ञानेश पाताडे प्रा.सचिन वंजारी आदी संवेदनशील नागरिक उपस्थित होते.