18.8 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

दामिनी पथक डायल ११२ प्रमाणे कार्यान्वित होणार – पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल

कणकवली पोलीस ठाणे येथे महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक वाहनांचा अनावरण सोहळा संपन्न

( मयुर ठाकूर ) कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा शांततामय जिल्हा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस दल नेहमीच सतर्क असतं. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील विविध समस्या सोडविणे, महिलांची सुरक्षितता यासारखे अनेक प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस दलातील स्थापित केलेले कक्ष सोडवत असतात. त्याच पार्श्वभूमीवर डायल ११२ प्रमाणे सेवा देण्यासाठी २०२३ साली दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली. दामिनी पथक डायल ११२ प्रमाणे कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनी किंवा महिला यांच्या असणाऱ्या समस्या किंवा एखादा प्रसंग ओढावला तर तात्काळ मदतीसाठी या दामिनी पथकाची मदत होणार आहे. त्यामुळे आता महिलांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.

कणकवली पोलीस ठाणे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दला तर्फे कम्युनिटी पोलीसींग उपक्रमांतर्गत महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक वाहनांचा अनावरण सोहळा व डाटा संग्रहित ठेवण्यासाठी टॅबचे वितरण आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिक्षक श्री. अग्रवाल बोलत होते.

पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते दामिनी पथकाच्या वाहनांची फित कापून अनावरण करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्याच्या अमलदारांकडे प्रत्येकी एक प्रमाणे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान दामिनी पथकाच्या वाहनांचे अनावरण झाल्यानंतर कणकवली शहरात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली होती.

यावेळी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग चे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, मोटर वाहन उपनिरीक्षक सिंधुदुर्गचे प्रदीप चव्हाण, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, भरत धुमाळ, प्रवीण कोल्हे, संदीप भोसले, सुनील अवसरमोल, शेखर लव्हे, प्रदीप पोवार, वैशाली आडकुर, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, राजकुमार मुंढे, शरद देठे, मंगेश बावदाने, विनोद चव्हाण, राजाराम पाटील, सुभाष शिवगण, माजी नगरसेविका मेघा गांगण, हरिभाऊ भिसे, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. विजय सावंत, प्रा. श्री. कांबळे, प्रा. मीना म्हाडेश्वर, प्रा. वनिता सावंत, प्रा. वाळके, प्रा. सुषमा कांबळे, सौ. नाटेकर व कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले म्हणाले, दामिनी पथक अनेक वर्षे कार्यरत आहे. महिलांना सुरक्षा आणि जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी दामिनी पथक नेहेमीच सतर्क असते. इतर जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोलिंग करताना बऱ्याच महिला रात्री ११ वाजता अगदी धाडसाने व बिनधास्त फिरतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढे सिंधुदुर्ग पोलीस दल महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहे. नागरिकांमध्ये एक भीती असते की एखादी माहिती पोलिसांना दिली, किंवा सांगितली तर आपलं नाव उघड होईल. परंतु असे होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग पोलीस दल खूप सतर्क आहे. गुप्त माहिती देणाऱ्यांची माहिती बाहेर दिली जात नाही, त्यामुळे कोणतीही माहिती देताना नागरिकांनी घाबरू नये. काही तक्रार असल्यास डायल ११२ वर फोन करून माहिती देऊ शकतात. तसेच दामिनी पथक पाठवण्याची सूचना देखील करू शकता. महिलांसाठी पोलीस पथकामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. दामिनी पथकातील पोलीस अंमलदार महिलांसाठी योग्य काम करतील, असा विश्वास अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रावले यांनी दिला.

या कार्यक्रमावेळी उपस्थित कणकवली कॉलेजच्या प्रा. शीतल सावंत, प्रा. सुषमा कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रा. सुषमा कांबळे म्हणाल्या, पोलीस दलाने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाजाला अशा उपक्रमांची गरज आहे. मुली किंवा महिला या घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना असुरक्षितता वाटते. ही भीती पुसुन टाकण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाने एक पाऊल पुढे उचलले आहे. पोलीस दलाने निर्मित केलेलं दामिनी पथक हे महिलांच्या संरक्षणासाठी महत्वाचे ठरणार आहे.

या कार्यक्रमावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कणकवली पोलीस ठाण्याच्या पूजा नांदोस्कर, विनया सावंत, सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अलमेडा मॅडम, संजाली पवार यांचा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा हिरेमठ, नलिनी शिंदे यांनी केले तर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!